शब्दशिल्प/यवतमाळ_यूगंधरा मराठी साहित्य, कला व सांस्कृतिक प्रतिष्ठान, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय काव्य स्पर्धेमध्ये यवतमाळ येथील ज्येष्ठ साहित्यिक तथा कवी विजयकुमार एस. ठेंगेकर यांना "आंतरराष्ट्रीय स्वातंत्र्यवीर सावरकर काव्य हिंदवी पुरस्कार" प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या या यशाबद्दल साहित्य क्षेत्रासह विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
विजयकुमार ठेंगेकर हे शासन सेवेत ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत असून, प्रशासकीय जबाबदाऱ्यांसोबतच त्यांनी गेल्या 31 वर्षांपासून साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. साहित्याची आवड जोपासत त्यांनी विविध दैनिके व वृत्तपत्रांमधून लेखनास सुरुवात केली. त्यानंतर कथा, कविता, ललित लेख, बालकथा आदी विविध साहित्यप्रकारांत त्यांनी सातत्याने लेखन केले आहे.
विजयकुमार ठेंगेकर यांचे लेखन अनेक नामांकित दिवाळी अंकांमधून प्रकाशित झाले असून ते आकाशवाणीसाठी नियमितपणे लेखन करीत आहेत. त्यांच्या साहित्यकृतींना वाचकांकडून नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
त्यांची आजवर अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून नुकतीच प्रकाशित झालेली "सावित्री : हरणार नाही, लढणार" ही कादंबरी विशेष चर्चेत आहे. शेतकरी आत्महत्येवर भाष्य करणाऱ्या व स्त्रीशक्ती, संघर्ष आणि जिद्दीचा प्रभावी संदेश देणाऱ्या या कादंबरीला वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या आंतरराष्ट्रीय काव्य स्पर्धेत विजयकुमार ठेंगेकर यांच्या कवितेची निवड होऊन त्यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्यांच्या साहित्यसेवेची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आल्याने यवतमाळ जिल्ह्याच्या साहित्यविश्वात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल साहित्यिक, कवी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच मित्रपरिवार आणि हितचिंतकांकडून विजयकुमार ठेंगेकर यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा