शुक्रवार, ५ जून, २०२६

वासनांध मानसिकतेचा गिधाडी डिएनए माणसातल्या सैतानात उतरलाय!

 

स्त्रीदास्य, स्रीपिडिताचा इतिहास वर्षोनुवर्षे चालत आलेला आहे. कर्मकांडी परंपरेने स्री शोषणाला समाज व राजमान्यता प्रदान केल्याची इतिहासात सोदाहरण नोंद हेच दृगोचर करते. राजेशाही राजवटीत बहुपत्नीत्व असलेला राजा सम्राटत्व  , शौर्य, अधोरेखित करीत असे. 

मनुवादी स्त्रीपिडनाचा, धर्माभिमानी मानसिकतेचा बुरखा फाडून डॉ .बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती चे सार्वजनिक दहन‌ केले. परंपरेच्या चिखलामध्ये महिलांना दुय्यम व नीचांकी ठरविणारा स्रिदास्याच्या भयावह  , तितकाच माणूसकीला काळीमा फासणारा खरा चेहरा समाजापुढे आणला . महर्षी कर्वे, राजाराम मोहन रॉय आदी समाजधुरीणांनीही  या अनुषंगाने तीव्र लढा उभारला  होता.

आज स्वातंत्र्याच्या वयाचा हिशोब मांडताना स्त्री समानता, स्त्रीमुक्ती या  अनुषंगाने कौटुंबिक, सामाजिक, राजकीय ,सांस्कृतिक धार्मिक आणि आर्थिक स्वातंत्र्याचा लेखाजोखा मांडला जाणे उचीत होईल.. महिला म्हणून होत असलेल्या लैंगिक शोषणात दिवसेंदिवस होणारी वाढ , मानसिक स्वरूपातील अत्याचाराची भीषणता "माणूस" म्हणून सून्न करणारी आहे. जंगली प्राण्यांचा एक नैतिक शिरस्ता असतो . तो आजही अबाधित राहिला आहे. कालोघात   होणार्या सामाजिक स्थित्यंतरातील साधनसामग्री, मानवी जीवनात सूखलोलूप प्रगतीची उंचावत जाणारी मृगजळीन दृष्टी. आदीम माणसाला लाजविणारी लैंगिक समानतेच्या नावाआड धुडगूस घालणारी रानटी भोगविलासता यासर्व घटकांचा अतिशय गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. मिडियावरील  दैनिक १००बातम्यात १० बातम्या  महिला बलात्कार, अत्याचार अपहरणाच्या असतात.

आज स्त्री  कुठल्याच क्षेत्रात  ,शाळा, काॉलेज, कार्यालय, इस्पितळ ,  कुठल्याही पदावर आणि  सर्वात बोचणारी  गोष्ट म्हणजे कोणत्याही नात्यात स्त्री सुरक्षित राहिली नाही. 

हैदराबाद येथील सुमती नावाची आय .पी. एस . अधिकारी एक सामान्य महिला म्हणून समाजापुढे उभी  राहते तेव्हा विविध क्षेत्रातील, वयातील, ४० पुरुष तिच्या कडे सार्वजनिक ठिकाणी जगजाहीरपणे शैय्यासोबत करण्यासाठी रेट विचारतात, थेट  येतेस कां? असा प्रश्न विचारून विनयभंग करतात. मध्यरात्री उफाळून आलेले पौरुषत्व भाजीपाल्याचा भाव करावा तसा  बाईच्या देहाची बारगेनिंग करतात , तिच्या बाईपणावर, देहावर, कौमार्यावर ४० गिधाडे अक्षरशः तुटून पडतात हे विदारक वास्तव आहे., एका महिला पोलीस अधिकारार्याने अनुभवलेले! 

कौटुंबिक हिंसाचाराची, घटस्फोटाची हजारो प्रकरणे कोर्टात धुळखात पडलेली आहेत. सद्यस्थितीत पशूरूपी लैंगिक मानसिकता उफाळून आली आहे भरचौकात, शाळेत, कार्यालयात, दवाखान्यात, सार्वजनिक उत्सवातून सर्वसाक्षी होत असलेली विटंबना चिमुरड्यांपर्यंत येऊन ठेपली आहे. मालेगावात विजय खैरनार नावाचा राक्षस नातीवर अतिप्रसंग करतो, भीमराव कांबळे चिमुकलीच्या तोंडात मोजे कोंबून अत्याचार करतो, १६ वर्षीय महिलेवर पतीच्या संमतीने सावत्र मुलगा  बलात्कार करतो, भंडारा शासकीय रुग्णालयात ६० वर्षीय  वृद्धाचा विनयभंग केला जातो, हवेली तालुक्यात दोन नराधम चिमुकल्या मुलीवर बलात्कार करतात .. ........

सर्व  घटना माणूस म्हणून बधीर करणार्या आहेत. बलात्कारी नराधमाचा भरचौकात चौरंग करणार्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र कुठे आहे? साधूसंत, महानुभाव यांनी पावन‌ केलेला पुरोगामी महाराष्ट्र कुठे आहे? 

राज्यात महिला अत्याचार, अपहरण, गॅंगवार, टोळीयुद्ध, गल्ली बोळात धुडगूस घालणारी कोयता गंग, एकंदरीत झुंडशाहीचा आलेख उंचावत चालला आहे, संपूर्ण महाराष्ट्र हिंसक घटनांच्या सावटाखाली चाचपडत आहे. खून, दरोडा, महिला अत्याचार, सांघिक कांडा सारख्या गुन्हेगारीवर गृह खात्याचा वचक राहिलेला नाही 

राज्यात दररोज सरासरी २७ चिमुकली पावलं शाळेत, बागेत न‌ पडता वासनांध कौर्याने कायमची छाटली जाताहेत. गेल्या चार महिन्यांत ३२०९ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत, वर्षभरातील ही संख्या १३हजार ४१० इतकी आहे. ही आकडेवारी देशाला  सून्न करणारी आहे 

अगणिक पिडिता, त्यांचे नातेवाईक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत 

राजकीय कृपाछत्राखाली  असे गुन्हे वाढले आहेत कां? असा दबक्या आवाजात जनतेचा सूर उमटू लागला आहे. महिलांचे अद्ययावत शोषण करणाऱ्या खरात सारख्या भोंदू बाबांची संख्या अचानक वाढते आहे .रोज नवीन भोंदू बाबा गजाआड होत आहे ही अपराधाची जलदगती फास्ट ट्रॅक कोर्ट  कां दाखवत‌ नाही ?  

 जलदगती न्यायालयाने आजपर्यंत किती प्रकरणे निकाली काढली, किती पिडितांना न्याय दिला, याची माहिती कुठेच मिळत नाही. अन्याय अत्याचार, बलात्कार, झुंजशाही रोखण्यासाठी कुठली जलद यंत्रणा आहे? बाहुबली गृहमंत्रालय बाहुबली राजकारणाची कळपुतली बाहुली बनले आहे कां? असे अनेक प्रश्न सामान्य जनतेला पडले आहेत 

"लेडी सूपरकाॅप" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवृत्त महिला पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे, एक आशा पल्लवित झाली आहे . महाराष्ट्रातील महिला शोषणाचा चढता आलेख रोखण्यात अध्यक्षा यशस्वी होतील कां? का त्यांनाही राजकीय हस्तक्षेपामुळे हतबल व्हावे लागले हे येणारा काळच ठरवेल. माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या पुरोगामी आश्वासक प्रतिमेला तडा गेला आहे, त्याच आरोपिच्या पिंजऱ्यात उभ्या आहेत. 

वासनांध गिधाडी मानसिकता जोपासणारा, माणसातला सैतान संतांच्या पावन भूमीत पोसला जातोय! "पोशिंदा कोण?"  हा प्रश्न जनमानस अस्वस्थ करणारा नक्कीच आहे.

विद्रोही कवी, ज्येष्ठ समीक्षक साहेबराव मोरे 

चाळीसगाव 

मो.९४०४०४८६०१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे....सौ. मनीषा विशाल सोन्नेकर

      मनुष्य हा देखील एक प्राणीच. मात्र, इतर प्राण्यांपेक्षा अतिशय हुशार व तर्कबुद्धी असलेला आणि चांगल्या विचारविनिमयाची कास धरणारा प्राणी. ...