ललित लेखनात पारंपरिक अभिव्यक्तीपासून वेगळी वाट धरत आशय, रचना, भाषाशैली, प्रतिमा आणि कथनतंत्र यात नवता आणणारे प्रयोग केले जातात. या प्रयोगशीलतेने लेखनातील मोनोटोनी टाळता येते. बदलती जीवनशैली, मानवी अनुभवातील वैविध्य, व्यक्तीचे अंतर्मन, काळाची गरज, कलाकृतीची मागणी यानुसार लेखक सतत नवनवे रूपबंध शोधत असतात. ''नवीन अनुभवांना नव्या अभिव्यक्तीची आवश्यकताअ असते'', हे बा. सी. मर्ढेकरांचे विधान प्रयोगशील साहित्याचे आधारसूत्र मानले जाते. एवढ्यातच लेखिका सुषमा मुलमुले देशपांडे यांची अशीच नव्या रूपबंधाची 'तमाच्या तळाशी दिवे लागले' ही चरित्रात्मक कलाकृती प्रकाशित झाली. एका अंध व्यक्तीच्या तेजांकित आयुष्याचा झळाळ साहित्यपटलावर आणणारे हे उत्कृष्ट लेखन आहे.
सुषमा मुलमुले यांनी डॉ. शिरीष देशपांडे या कॉन्स्टिट्यूशनल लाॅ या विषयात गोल्ड मेडल मिळविणाऱ्या, उन्नत सामाजिक भानाने जगण्याला भिडणाऱ्या, शंभर टक्के अंध असूनही डोळसालाही लाजवेल असे चारही पुरुषार्थ गाजविणाऱ्या, प्रचंड उत्साही आयुष्याचा अतिशय समंजस वेध या चरित्र लेखनातून घेण्याचा प्रयत्न झाला आहे. एका पत्नीने केलेले पतीचे चरित्रकथन असे स्वरूप या चरित्राचे आहे; पण या लेखनाच्या लेखिका चरित्रनायक डॉ. शिरीष देशपांडे यांच्या पत्नी डॉ. शैला देशपांडे नाही; तर सुषमा मुलमुले आहेत.
या चरित्रलेखनाला डॉ. शिरीष देशपांडे यांच्या संबंधितांनी व्यक्त केलेल्या भावना, वक्तव्ये, पत्रे आणि आठवणी परिशिष्टाअंतर्गत जोडल्या असल्याने लेखिकेला सत्याचा अपलाप होणार नाही यासाठी दक्ष राहावे लागले असणार; तरीही हे लेखन माहितीवजा न होता लालित्यपूर्ण आणि मनोवेधक करण्यात लेखिका मुलमुले यशस्वी झाल्या आहेत. या चरित्रग्रंथाच्या प्रस्तावनेत डॉ. भारती सुदामे म्हणतात, "एका व्यक्तीने सांगून दुसऱ्या व्यक्तीने लिहिलेलं असलं, तरी हे शब्दांकन नाही. लेखिकेने तसा दावाही केला नाही. मग हे डॉ. शिरिष देशपांडे यांचे चरित्र आहे का? तसं म्हणणंही खूप समर्पक वाटत नाही. कारण चरित्रलेखनाची पारंपरिक पद्धत यात नाही. लेखिकेच्या प्रतिभेचा प्रत्यय यात वारंवार येतो." असं हे चरित्रलेखन रचनातंत्रदृष्ट्या अभिनव आहे.
डॉ. शिरीष देशपांडे या अंध प्राध्यापकाच्या व्याख्यानाला प्रा. शैला महाविद्यालयीन कलिगसह उपस्थित असतात. त्यांच्या पदव्या आणि विद्वत्ता पूर्ण भाषण ऐकून प्रा. शैला भारावून जातात. 'बापरे दृष्टीहीं असूनही एवढा व्यासंग!' त्यांच्या मुखातून सहज उद्गार येतात. नंतरही शिरीष देशपांडे त्यांच्या डोक्यातून जात नाही. वयाची पस्तिशी गाठलेल्या डॉ. शैलांना लग्नच करायचे नसते आणि डॉ. शिरीष देशपांडे यांनी मनमस्तिष्कावर कब्जा केलेला. त्यांनी एका क्षणी निर्णयही घेऊन टाकला, 'लग्न करीन तर डॉ. शिरीषशीच नाहीतर कुणाशीही नाही.'
कार्ल गॅस्ताव युंग या मानसशास्त्रज्ञाने मानवी अचेतन मनात असणाऱ्या अनेक आदिबंधांची मांडणी केली आहे. या आदिबंधांच्या साह्याने मानवी मनाची उकल करता येते. प्रत्येक पुरुष मनात एक स्त्री प्रतिमा दडली असते तिला युंग ॲनिमा नाव देतात; तर प्रत्येक स्त्री मनात एक पुरुष प्रतिमा दडली असते तिला युंग ॲनिमस म्हणतात. डॉ. शैला यांची ही प्रेमानुभूती केवळ आकर्षण नसून त्यांच्या अचेतनातील युंगप्रणित 'ॲनिमस ऑर्किटाईप'ची प्रत्ययकारी खूण होय. शिरीष यांच्या रूपात त्यांना प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वकर्तृत्वाने उभा राहिलेला, आत्मविश्वासी संघर्षशील पुरुष दिसतो. त्यांच्या मनातील आदर्श पुरुषप्रतिमेशी ही प्रतिमा तंतोतंत जुळते आणि त्यामुळे पहिल्याच भेटीत एक अंत:स्पर्शी आकर्षण निर्माण होते. या आकर्षणामागे संशोधन प्रोजेक्टला मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या डॉ. गाडगीळ या दृष्टीहीन पण स्वयंपूर्ण, विद्वान व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव आहे. या मार्गदर्शकाने त्यांच्या अचेतन मनात एका विशिष्ट पुरुषप्रतिमेचे बीजारोपण केले. त्यामुळे त्या शिरीष यांच्या अंधत्वाकडे न पाहता त्यांच्या जिद्द, स्वाभिमान आणि आत्मनिर्भरतेकडे आकृष्ट होतात. त्या म्हणतातही, "संशोधनाच्या निमित्ताने मला लाभलेल्या डॉ. गाडगीळ यांचा सहवास हा केवळ योगायोग नव्हताच! तर मी शिरीषची पती म्हणून निवड करावी यासाठी माझं मन तयार करण्यासाठीची ती एक ईश्वरी योजना होती."
वयाच्या आठव्या वर्षी फटाक्याच्या स्फोटामुळे लहानग्या शिरीषला अंधत्व आलं. आई-वडिलांच्या समंजस, सकारात्मक दृष्टिकोनामुळे त्याच्यात आत्मविश्वासाचे बिजारोपण झाले. एल. एल. बी. च्या परीक्षेत आत्तापर्यंतच्या आपल्या वडिलांचा गुणाचा उच्चांक मोडत विद्यापीठाचे सुवर्णपदक मिळविले. नागपूर विद्यापीठात स्नातकोत्तर विभागात प्रोफेसर झाले. नोकरीमुळे स्थिरस्थावर झाल्यावर त्यांनी अंधांसाठी कार्य सुरू केले. नॅशनल फेडरेशन ऑफ ब्लाइंड (एन एफ बी) या संस्थेचे अखिल भारतीय अध्यक्ष म्हणून तन-मन-धनाने काम केले. नागपूरच्या ज्ञानज्योती निवासी अंधविद्यालयाचे ते संस्थापक सदस्य होते. विद्यापीठात अध्यापन करताना अनेक विद्यार्थ्यांना घडविले. होतकरू गरजवंत विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची मदत केली. अनेक सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेतले. घरी मदतीला असणाऱ्या बाया, माणसं, कारचा ड्रायव्हर यांच्यावर घरच्या सदस्यांप्रमाणे प्रेम केले, आर्थिक मदत केली.
दृष्टीहीन शिरीष अचंबा वाटावा अशी घरातील सर्वच काम सहजपणाने करत. शैलाला कधी कधी हे पटत नसे तेव्हा 'मी आधी आईलाही मदत म्हणून ही काम करायचो. आता तुझ्याकरता करतो', म्हणायचे. आई, पत्नी आणि नंतर आलेल्या सुनेलाही कुठल्याही कामांत ते सहजतेने मदत करत. सिलेंडरचे कनेक्शन जोडणे, पाण्याच्या पंपामधली हवा काढून तो पुन्हा सुरू करणे अशी नवीन कामेही ते शिकून घेत. अंध असल्याची सबब त्यांनी कुठेच पुढे केली नाही. अंधत्व हे व्यक्तिमत्त्वाच्या मर्यादेचे नव्हे, तर अंतःशक्तीच्या सामर्थ्याचे रूप आहे, याचा प्रत्यय जणू त्यांना स्वत:लाच घडवायचा होता.
डॉ. शिरीष अभ्यासू, बुद्धिमान, हसमुख, धैर्यशील व्यक्ती होते. त्यांच्या हुशारीचे तेज त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होते. आत्मविश्वासान प्रफुल्लित असं उमदं व्यक्तिमत्व होतं त्यांचं. आपल्या किंवा कुणाच्याही आंधळेपणाची किंवा कोणत्याही न्यूनांची कोणी कीव करावी हे त्यांना मुळीच पटत नसे. जगणं साधं, सहज, सोपं करण्याकडे त्यांच्या कल असायचा. 'स्पर्श' या गाजलेल्या हिंदी सिनेमातील व्यक्तिरेखा खूप नकारात्मक, चिडचिडी, संशयी दाखवली आहे, या त्यांच्या चित्रपटांविषयीच्या अकलनावरून त्यांनी अशा नकारात्मक प्रतिमेपासून जाणीवपूर्वक स्वतःला दूर करण्याचा प्रयत्न केला. आपले अंधत्व आपल्या वर्तनातून आणि जीवनदृष्टीतून त्यांनी प्रकाशमान केले.
या पती-पत्नीचे सुखमय सहजीवन लेखिका सुषमा मुलमुले यांनी फार सुरसपणे कथन केले आहे. काही प्रसंग तर फार चटका लावणारे आहेत. एका प्रसंगी लग्नाआधी शैलाला आपल्या होणाऱ्या पतीचे डोळे बघायचे असतात. शिरीषच्या डोळ्यांवर नेहमी काळा गाॅगल असतो. "प्लीज, तुझा गॉगल काढ. मला तुझे डोळे बघायचे आहेत'', शैलाने विनंती केली. शिरीषने काहीही आढेवेढे न घेता गॉगल उतरवला. ऑपरेशन झालेल्या डोळ्यांच्या खाचा शैलाला दिसल्या. शैला लिहितात, "काहीही न बोलता मी डोळ्यांवरून हात फिरवला. तो स्पर्श शिरीषला आश्वस्त करण्यासाठी होता. तू जसा आहेस तसा मला हवा आहेस, असं त्या स्पर्शाने शिरीषला सांगावं यासाठी होता. स्पर्शाची ही भाषा त्याला नक्कीच कळली असेल. त्याचं मन अतिशय संवेदनशील होतं. तसंही पती-पत्नीच्या सहजीवनात शब्दापेक्षाही स्पर्शाला, स्पर्शाच्या भाषेला महत्त्व असतं. तसाच हात त्याच्या डोळ्यांवरून मी आणखी एकदा फिरवला. १० फेब्रुवारी २०२१ ला शेवटचा. पण त्यावेळी मात्र तो स्पर्शाची भाषा कळण्याच्या पार पलीकडे निघून गेला होता." हा भावव्याकूळ प्रसंग मुलमुले यांनी फार हृदयस्पर्शी रेखाटला केला आहे. शरीराच्या न्यूनत्वापलीकडे जाणारे आत्मीय ऐक्य पहिल्या स्पर्शातून जाणवते तर शेवटी मृत्यूसमयी अखेरचा स्पर्श जो विरहाची असह्य जाणीव व्यक्त करतो. विवाहपूर्व आश्वासक स्पर्श आणि मृत्यूपूर्व अखेरचा स्पर्श या दोन टोकांतल्या भावनिक ताणातून एका विलक्षण भावसौंदर्याची निर्मिती लेखिकेने केली आहे. अशी अनेक प्रसंगं आहेत, विस्तारभयास्तव उल्लेख करणे टाळावे लागत आहे.
एक नोंद पुन्हा घ्यावी वाटते. प्रो. डॉ. वर्षा देशपांडे ही सरांची आवडती विद्यार्थिनी आणि मानसकन्या तिने सरांना बरेचदा 'मेडिकल सायन्स फार पुढे गेले आहे. तुम्ही डोळ्यावर उपचार का करून घेत नाही', अशी विचारणा केली तेव्हा सर 'आय डोन्ट वॉन्ट टू सी धिस ब्लडी वर्ल्ड. मी जसा आहे, तसाच आनंदात आहे', असे म्हटले. या संपूर्ण चरित्रात आपण पाहतोय की जगाचा त्यांना फार वाईट अनुभव आलेला नाही. तरी सर असे टोकाचे का बोलले असावे? त्यांच्या या टोकदार प्रतिक्रियेचे आश्चर्य वाटते. कदाचित अंधत्वासह जगण्याची त्यांनी मनोमन सवय करून घेतली असावी. किंवा ते इतर कार्यात इतके व्यग्र होते की स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास त्यांना अवकाश मिळाला नसावा. विशेष म्हणजे त्यांनीच एका ठिकाणी “माझ्या जीवनातील सर्वांत मोठे दुःख म्हणजे मी माझी पत्नी आणि मुलाला कधीच पाहू शकलो नाही,” अशी हळवी खंत व्यक्त केली आहे. त्यामुळे निदान यासाठी तरी त्यांनी डोळ्यांची तपासणी करायला हवी होती, असे नकळत वाटून जाते. जगण्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहणाऱ्या आधुनिक विचारसरणीच्या शिरीष सरांचे हे स्वतःबाबतचे दुर्लक्ष म्हणावे लागेल. बी.पी., शुगरच्या बाबतीतही काहीसे असेच झाले असावे. असो, या जर-तर पेक्षा आयुष्य आपल्या नियत दिशेनेच पुढे सरकत असते.
या लेखनासाठी लेखिका सुषमा मुरमुरे यांनी घेतलेले परिश्रम ‘असा जुळून आला योग’ या मनोगतातून जाणवतात. डॉ. शिरीष यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू समजून घेण्यासाठी त्यांनी अत्यंत बारकाईने पूर्वतयारी केली. त्या म्हणतात, “शैलाताईंनी दिलेल्या आठवणी आणि मी गोळा केलेला एवज यावरून आता शिरीष यांचे व्यक्तिमत्त्व मी ३६० अंशांच्या कोनातून पाहू शकत होते.” ही इत्यंभूत तयारी आणि वाचकांच्या हृदयाशी थेट संवाद साधणारी त्यांची ओघवती लेखनशैली, यामुळे ही कलाकृती एक भावस्पर्शी साहित्यकृती म्हणून वाचकांपुढे आली. मैत्रीण लेखिका सुषमा मुलमुले यांचे या उल्लेखनीय साहित्यनिर्मितीसाठी मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील साहित्यप्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा!
- डॉ. सुनंदा जुलमे, नागपूर.
मोबा. 8766422475.
*****



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा