गुरुवार, ७ मे, २०२६

मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्या वतीने मराठी राजभाषा दिनानिमित्त कवी संमेलनाचे आयोजन

 


शब्दशिल्प/नागपूर_ "मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित होणाऱ्या सर्व कार्यक्रमांच्या आयोजनांची कल्पकता मला नेहमीच भावते. आज मराठी राजभाषा दिन, एक मे महाराष्ट्र दिन, तथागत गौतम बुद्ध पौर्णिमा आणि आणिआंतरराष्ट्रीय कामगार दिवस या चतुरंग योगाच्या निमित्ताने सुरेख असे कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. जीवनाचे सर्वच रंग कवी कवयित्रींनी आपल्या कवितांमधून व्यक्त केले.. त्यामुळे आयोजन फारच उंचीवर गेले." असे उद्गार मराठी चित्रपट महामंडळाच्या माजी संचालक मा.माधुरीताई आशीरगडे यांनी काढले.मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्या वतीने मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित कविसंमेलनाच्या विशेष अतिथी म्हणून त्या उपस्थित होत्या.

        सुप्रसिद्ध कवी आणि कलावंत मा.निरंजन मार्कंडेवार यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्योतिबा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य आणि कवयत्री मा.अरुणाताई कडू यांनी केले. यावेळी  सुप्रसिद्ध कवी श्री विजय मेश्राम आणि प्रा. डॉ. राम बुटके प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते .ऑनलाइन झालेल्या कार्यक्रमाची दीपप्रज्वलनाने सुरुवात झाली. 

मायमराठी नक्षत्र  प्रतिष्ठानच्या अध्यक्ष विजया मारोतकर यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी आजच्या आयोजना मागची भूमिका स्पष्ट करत अल्पावधीत संस्थेने आजवर साहित्य संमेलने, प्रकाशने, कवी संमेलने, आषाढस्य प्रथम दिवसे अशा विविध साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करून मराठीच्या आसमंतात स्वतःची ठसठशीत अशी नाममुद्रा उमटविली असल्याचे सांगत 

आजचा हा ७२वा कार्यक्रम असल्याचे म्हटले.

कार्यक्रमाच्या उद्घाटक ज्योतिबा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य अरुणाताई कडू यांनी उद्घाटन झाल्याची घोषित केले आणि कवी संमेलनाला सुरुवात झाली. एकापेक्षा एक जवळपास 22 /23 कवी कवयित्रींनी आपला सहभाग नोंदवत कवीसंमेलन उत्तरोत्तर उंचीवर नेले.

 डॉ. शील बागडे यांच्या गौतम बुद्धाला समर्पित कवितेने सुरुवात झाली.

"आई तुझ्या द्वारे मी या जगात आले

अस्तित्व मात्र माझे तुझ्याही निराळे.."

अशा आई प्रतीच्या भावना डॉ. संगीता जिवनकर यांनी काव्यात गुंफल्या तर जगण्यातील श्वासांचं नातं किती महत्त्वाच आहे ...याची जाणीव रोशनी गतफणे यांनी करून दिली. जीवन राजकारणे यांनी मराठी भाषेचं गुणगान करणारी रचना सादर केली. प्रणोती कळमकर यांनी आईला समर्पित रचना सादर केली.

 तर माधुरी व्यवहारे यांनी जगण्याच्या पातळीवर मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांचा कल्लोळ.. कळते पण वळत नाही अशा आशयाच्या रचनेतून साकार केली.

  कामगारांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी सुरेख रचना सादर करतांना गोविंद सालपे म्हणाले.....

     नका करू रे स्वागत

     माझे फुलांच्या हारांनी

     त्या घामाच्या धारांनी

      मी शोभतसे....


ज्योती ताम्हणे यांनी भावपूर्ण रचना सादर केली.

पुण्याहून अंजलीताई टाकळीकर यांनी मराठीला समर्पित ...

मराठी असे आमची मायबोली

अमृतानुभव गोड तिची बोली

अशी रचना सादर केली तर डॉ.माधव शोभणे यांनी भोंदू बाबा विषयी आपल्या खास शैलीत सुरेख असे भारुड सादर करून कवी संमेलन नितांत उंचीवर नेले.. डॉ. मोनाली पोफरे यांनी स्वातंत्र्य देवतेला समर्पित कविता सादर केली तर वर्षा देवरस यांनी मराठीच्या सर्वांगांना स्पर्श करणारी सुरेख रचना सादर केली. 

डॉ. राजेश काळे यांनी कविसंमेलनातील कवींची कमाल!”

सादर केली...    ते म्हणाले की ....

मंच सजला, दिवे लागले, जमली कवींची रांग,

पहिला कवी उभा राहिला, चेहऱ्यावरती ताण...

नात्यांच्या वळणांचा परामर्ष घेतला तर पुण्याहून जुळलेल्या स्मिता खानझोडे 

यांनी जीवन कसे जगावे...? याबाबतचे नितांत सुरेख उपदेशात्मक काव्य सादर केले. श्रद्धा बुरले यांनी सह्याद्री आणि शिवरायाची आठवण करून देणारी सुरेख रचना साकारली. मंजुषा कौटकर यांनी प्रेयस भाव व्यक्त करणारी प्रेमाला समर्पित सुरेख अशी गझल सादर केली तर विजया मारोतकर यांनी जीवनानुभावावरचे....

      मनासारखे सारे काही करता आले नाही ...

     जगताना मग स्वतःसाठी उरता आले नाही..

असे शेर असलेली गझल सादर केली..

दशरथ पंत अतकरी यांनी मराठीभाषेच्या अभिमानाची काव्य गाथा साकारली...तर नीता अल्लेवार यांनी 

परंपरांची गाथा आणि प्रगतीची नवी ओढ,

माझा महाराष्ट्र आहे जगाहुन न्यारा अन् गोड..!"

महाराष्ट्र राज्याचे गुणगान करणारी आपली रचना सादर केली.  डॉ. सीमा पांडे यांनी "काय खावे आणि काय खाऊ नये "..याबाबतची खुसखुशीत पण महत्त्वाची

"आरोग्याचा मंत्र सांगते तुम्हाला कवितेतून

लक्ष देऊन ऐका आणि बदल करा वागण्यातून.."

ही कविता सादर केली मराठीवर इंग्रजी भाषेच्या होणाऱ्या आक्रमणा वर प्रहार करणारी दमदार रचना सादर करतांना राजश्री कुळकर्णी म्हणाल्या की.....

परभाषेच्या आक्रमणाने

घायाळ झाली मराठी भाषा,

स्वप्न आता नयनी वसावे

समृद्ध होवो मराठी भाषा

ज्येष्ठ कवयित्री वैशालीताई मुलमुले यांनी आपली प्रासादिक रचना सादर केली.

            प्रमुख अतिथी श्री विजय मेश्राम यांनी मराठीवर


"तिचा पदर विस्तीर्ण

घट्ट बांधलेल्या गाठी

सावलीत मी निवांत

तिच माय माझी मराठी --"


अशी  नितांत सुरेख रचना ...तसेच जीवनावर भाष्य करणारी अशा दोन कविता सादर करून काव्य रसिकांची दाद मिळविली. प्रा. राम बुटके यांनी आपले  दिलखुलास मनोगत व्यक्त केले. 

माधुरीताई अशीरगडे यांनी "जीवनगाणे" ही कविता  सुरेखरित्या गाऊन सादर केली.

   कविसंमेलनाचे अध्यक्ष मा.निरंजन मार्कंडेवार यांनी...

बाई ग कितीदा समजावलं तुला..

 पावसात अशी एकटी भिजू नकोस म्हणून 

...अशी भर उन्हाळ्यात पावसाला निमंत्रित करणारीअध्यक्षीय कविता सादर करून गारवा निर्माण केला... आणि खऱ्या अर्थानं कवी संमेलन उंचीवर नेले.

           ऑनलाइन पद्धतीने झालेल्या कार्यक्रमाला मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्या सर्व सभासदांची उपस्थिती होती. पुणे, शेगाव येथूनही कवी कवयित्री नी आपल्या कविता सादर करत सहभाग नोंदविला.

एकूणच कार्यक्रम आणि कवी संमेलनाचे सूत्रसंचालन डॉ.सीमा अतुल पांडे आणि राजश्री कुळकर्णी यांनी केले.. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांचे आभार मानले.आयोजनाचे सार्थक झाल्याची अनुभूती सर्वांनी घेतली.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे....सौ. मनीषा विशाल सोन्नेकर

      मनुष्य हा देखील एक प्राणीच. मात्र, इतर प्राण्यांपेक्षा अतिशय हुशार व तर्कबुद्धी असलेला आणि चांगल्या विचारविनिमयाची कास धरणारा प्राणी. ...