वेगळ्या नावाची माणसं काहीतरी वेगळीच असतात, हा माझा अनुभव आहे. 'अहिंसक दहिवले' हे त्यातलेच एक. आजच्या या हिंसक जगात, हिंसक समाजात एखाद्या माणसाचं नाव 'अहिंसक' असू शकत यावर विश्वासच बसत नाही. अर्थात हे नाव ठेवण्यात आई- वडिलांचे नक्कीच काही प्रयोजन असावं. पुढे जाऊन आपल्या मुलाचं भवितव्य या नावातून घडायला सुरुवात व्हावी, हा उद्देश असावा असं काहीसं हे नाव. मस्त आहे ना?
आणि माझ्या अपेक्षेप्रमाणे अशी वेगळ्या नावाची माणसं काहीतरी वेगळं करतात, वेगळं वागतात. निदान वेगळ्या स्वभावाची, वेगळ्या बुद्धिमत्तेची, वेगळ्या मतप्रवाहाची, वेगळ्या धाटणीची नक्कीच असतात. आता नावात काय असतं ? असं कोणी विचारलं तर त्याला हे सडेतोड उत्तर आहे. नावात सारं काही आहे. आणि या नांवात तर 'अहिंसा' दडलेली आहे. हिंसा नाही . आणि विशेष म्हणजे मी वर लिहिल्याप्रमाणे आपलं वेगळेपण सिद्ध करायला हे नाव समर्थ आहे.
अहिंसक दहिवले सरांनी आपले भावतरंग ज्यातून उमटवलेले आहेत, आपल्या मनातील अंतरंगांना, आपल्या लेखणीने समाज मनावर तरंगत ठेवलेले आहे, तो म्हणजे त्यांचा पहिला कविता संग्रह 'तरंग'. जनामनाच्या दुःखांचे प्रतिबिंब रंगवितांना या कवितासंग्रहातून अनेक दांभीक कृतींवर त्यांनी घणाघात आघातही केलेले आहेत. हे करताना ते बहुजनांना विसरले नाहीत. म्हणूनच त्यांनी हा कवितासंग्रह बहिष्कृतांना माणसाचं हक्क मिळवून देणारे घटनेचे शिल्पकार 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' यांना व त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या तमाम बहुजनांना अर्पण करून आपले समाजाप्रती असलेले ऋण फेडण्याचा प्रयत्न केलेला आहे.
या समाजाने वाळीत टाकलेल्या बहिष्कृतांना बाबासाहेबांनी दिलेल्या न्यायाची ग्वाही देताना त्यांच्या कर्तृत्वाप्रती आदर व्यक्त करतानाच आपल्या 'बाबा' या कवितेत कवी सांगतात-
उतरंडीखाली दबलेल्यांना, गावकुसाबाहेर फेकलेल्यांना
वाळीत कुजत टाकलेल्यांना,
तू लेकरापरीस छातीस कवटाळलंस.
त्यांना ओंजळीने चवदार पाणी पाजलंस.
ते आता प्रशांतालाही कवेत घेत आहेत बाबा.
आता हा बहिष्कृत समाज जागा झालेला असून तो समाजात आपलं स्थान निर्माण करून उच्च राहण्याच्या संकेतांना उभारत असल्याचे सुचक विधान वरील कवितेतून कवींनी केलेलं आहे.
कवी व्यवसायानं शिक्षक आहेत. बौद्ध समाजातील असून एका शासकीय शाळेतील मास्तर आहेत.
पण पहिल्यांदा जेव्हा ते शाळेत रुजू होण्याकरिता गेले, गावात राहण्याकरता किरायची खोली शोधायला गेले, तेंव्हा त्यांची जात कशी आडवी आली, ते कडवट अनुभव सांगताना -
'त्यांचा प्रश्न, तुम्ही कोणत्या जातीचे ? माझा स्वभाव उफाळून आला नी बेंबीच्या देठातून आवाज आला 'मी बौद्ध'.
त्यांनी 'महार' ऐकलं. आणि ते म्हणाले-
'तुमच्या जातीचे इथे एकही घर नाही'
(कविता - 'त्यांचा प्रश्न'.)
गाव तिथे महारवाडा, अशी विषमता दर्शविणारे व काळजास भोक पाडणारे हे विदारक दर्शन. देशाच्या स्वातंत्र्यानंतर व बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानानंतरही जातीयता कशी माणसाच्या मनात घर करून आहे, हे दाखवणारे भीषण वास्तव. हेच कडवट वास्तव पुढील 'प्रमिला' या कवितेतूनही प्रत्ययास येते -
'मडकं घेऊन माय हिरीभोवती फिरे.
गोचड्या तिचं मडकं फोडायला करे.
दादा, एकच मडकं पाणी दे प्यायले.
घरी लहान लेकरू, लागलं रडायले.'
हेच भयानक सत्य त्यांच्या इतर कवितां मधूनही अनुभवास येते.
कवीने गडचिरोली जिल्ह्यातील एका महाकाय प्रश्नाला हात घातलेला आहे ; तो म्हणजे 'नक्षलवाद'. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर या समस्येने आता चाळीशी पार करून पन्नासाव्या वर्षाकडे पदार्पण केलेले आहे. पण ती सुटण्याचे नाव दिसत नाही. तशातच आदिवासींच्या व्यथांचे निरसन होताना दिसत नाही. शासन तोडगा काढू इच्छित नाही. लोकप्रतिनिधी गप्प बसलेत. मिडिया सत्य दाखविण्याऐवजी विपर्यास करून व भडक बातम्या देऊन प्रकरण चिघळवण्याचेच काम करतात.हे प्रश्न सुटावे, असे त्यांना वाटतच नाही. 'नक्षलवाद कसा संपणार ? असा प्रश्न तेच उकरून काढतात. आणि याचे उत्तरही अनाकलनीय आहे, असं तेच देतात.'
पण कवीला मात्र याचे उत्तर सापडलेले आहे. ते विधायक कामाचा ध्यास घेण्याचा सल्ला देतात. कवी त्यासाठी 'आशावादी' आहेत. त्यांच्या मते फार सोपं आणि सरळ उत्तर आहे या प्रश्नाचं. म्हणून ते सांगतात -
'उत्तरला प्रतिउत्तर देऊन नक्षलवाद मिटणार नाही.
शांतीनच मिटवला जाईल.
क्रांतीने तो सुटणार नाही,
आता वाटचाल केली पाहिजे.
माणसं मनापासून जोडली पाहिजे.' कवीचा आशावाद. बरोबर आहे कवीचं.
यावर मलाही म्हणावसं वाटतं-
'आतंकवाद संपून जावा,
वाल्याचा वाल्मिकी व्हावा.
एक अंगुलीमाल इथे निपजावा.
पाठोपाठ तो 'अशोक' यावा.
चुकीच्या क्रांतीची धार बोथट करण्या, शांतिदूताने जन्म घ्यावा.
माणसाला माणूस जोडण्या,
एक बुद्ध पुन्हा अवतरावा.
एक बुद्ध पुन्हा अवतरावा.'
'तरंग' कवितेचा एक वेगळाच खाक्या आहे.
'तरंग' आशा निराशेचा द्वंद्वयुद्ध,
कधी कठोर कधी शांत बुद्ध,
'तरंग' माझ्या प्रेतावरील अखेरचा टाहो,
तो कायमस्वरूपी लक्षात राहो'
अशी आशा कवी करतात. बाबासाहेबांच्या महानिर्वाणाची बातमी गावात येताच सुका बापूला दुःख अनावर झालं. त्यांनं बातमी दिली-
'बाबासाहेब गेले व माय् , बातमी आली शाळेमंदी.
सुकाबापू रडत होता, सांगत व्हता
गावामंदी.
तुही माय मरली नाय, तुहा बाप मरला नाय .
शिवी डोम्यानं देल्ली, तरी हंबरला वासरू.'
या सुकाबापूला गावानं वेड्यात काढलं. जातीयतेचा उद्रेक वाढतच होता. पण सुक्या निधड्या छातीचा वाघ होता. त्यांनं पाटीलपांड्यांना सळो की पळो करून सोडलं. जातीभेद करणाऱ्यांचा सामना केला. व पुढे गावात शाळा काढून 'भीम गर्जना' केली. उच्च कोटीची ही काव्यप्रतिभा.
कवी 'अहिंसक दहिवले' झाडीपट्टीतील हाडाचे साहित्यिक आहेत. बाबासाहेबांचे बोट धरून पुढील मार्गक्रमण करायचं त्यांनी ठरवलं आहे. वयाच्या उत्तरार्धातही अजून त्यांचं तारुण्य शाबित आहे. या कवितासंग्रहाच्या शेवटच्या ओळी आहेत-
'अजान होते वृक्ष, अजान होत्या वेली. सळसळणाऱ्या रानालाही,
'जयभीम' ची जाणीव झाली.'
ही जाणीव समस्त वाचक मंडळीनाही होवो,साहित्यिकांनाही होवो,ही सदिच्छा. कवी अहिंसक दहिवले यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीस मनापासून हार्दिक शुभेच्छा ! सर्व रसिकांनी एकदा तरी हा कवितासंग्रह मनापासून वाचावा, रसग्रहण करावं ही विनंती. सर -
'असेच उठोत तुमच्या मनात तरंग.
व्हा साहित्य प्रांतात तुम्ही दंग.
वेदनेच्या हुंकाराचे जळजळीत निखारे,
आणि काव्यप्रतिभेचे उमटावेत रंग'.
चुडाराम बल्हारपुरे (समीक्षक)
'महामृत्युंजय निवास', गडचिरोली.
भ्रमणध्वनी- ९६२३६६३४३५.
_____
'तरंग' ( कवितासंग्रह) कवी - अहिंसक दहिवले
प्रकाशक- 'अजिंठा' प्रकाशन, गडचिरोली.
किंमत रुपये 100/- फक्त.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा