शनिवार, २५ एप्रिल, २०२६

कविता : राजेश बारसागडे, जीवन खोब्रागडे, कारभारी त्रिभुवन, गोपाळ धारपवार, कृष्ण कुंभारे

 


स्वप्नराणी 


तू माझ्या मनीची अलगद लागलेली चाहूल,

तुझ्या नावाने धडधडतो हा हृदयाचा फुल,

तुझ्या हास्यात दडली आहे स्वर्गाची झुळूक,

माझ्या जगण्याची तू आता झालीस गं भूक!


तुझ्या त्या नजरेत हरवून जाते माझी दुनिया 

तुझ्या शब्दांत ऐकू येते मज प्रेमाची गोडगाणी 

तू जवळ असलीस की फुलते आयुष्य माझे 

तूच आहेस माझ्या मनातली ती स्वप्नराणी!


माझ्या हाती तुझा हात असता वाटे आधार 

तुझ्या स्पर्शात प्रेमाची ऊब जाणवे लडीवाड

तुझ्या सोबतीने प्रत्येक क्षण सोन्यासारखा वाटे,

तू जवळ नसशील की सारा जग वाटे ओसाड!


तुझ्या आठवणींनी मन माझं रोजच फुलतं,

तुझे नुसते नाव घेता हृदय माझं गुपचूप हसतं

तूच माझ्या उष्ण श्वासांचा हवाहवासा गोडवा 

तुझ्याविना अधुरी वाटे माझी प्रत्येक मधुरात!


तुझ्या प्रेमात हरवणं हेच माझे जीवनगाणं

तुझ्याशिवाय कोरे माझ्या आयुष्याची पानं!

तूच माझ्या स्वप्नांना दिली एक सुंदर दिशा,

तुझ्या प्रेमानेच उजळली जगण्याची आशा!


तूच माझ्या हृदयाचा गुपित गोड मधुर स्वर,

तूच माझ्या जीवनाची नवी वसंत पालवी गं

मला देवाने दिलेली तू सर्वात सुंदर अशी भेट,

माझ्या प्रेमाची तू दिलवर मी तुझा जिवलग!

     - राजेश दे.बारसागडे 

     सावरगाव ता. नागभीड    

       जि.चंद्रपूर 

     मो : 8830961332

_______

सारथी


अज्ञानी धर्माचे ज्ञान वाटू लागले l 

सज्ञानी कर्माचे ज्ञान वाटू लागले l l


गुलामगिरी धोक्याची अघोरी चाल ही l

स्वतःच्या लोकांना दान वाटू लागले l l


बिना कामाचे लोकास पैसे पाहिजे l

तसेही शब्दाचे वाण वाटू लागले l l 


विकृतीचा मेंदू आज ठरला पाशवी l

विनाकारण श्रमदान वाटू लागले l l


शरण गेले काही स्वार्थ साधू सारथी l

तयाचे येथे सुखदान वाटू लागले l l


जीवन खोब्रागडे 

टेक्नो रेसिडेन्सी नागपूर

_____

" निवांत मनसोक्त! "


बाई दादा तुम्ही,

माझे जन्म दाते,

बाई-दादा उच्चारताचं 

डोळ्या समोर दिसते,

हुबेहूब प्रतिमा तुमची!

त्याचं अंगकाठीत,

त्याचं चेहरेपट्टीत ,

निरागस,निर्मळ,

समाधानी असल्याचे,

बोलताना नित्य,

तेच शब्द मोलाचे,

मोजून मापून आलेले,

माया ममता तीच,

अखंड भरलेली!

तुमच्या याचं,...

याचं आशीर्वादानं,

सुखात जगतोय आम्ही ,

सर्व तूमची मुलं,

सुना अन नात सुनाही!

तुमचे नात-नातू,

नि पणतू सुद्धा,

तुमच्या प्रतिमाना,

जवळ घेऊन,

कवटाळतात कधी कधी,

नाजूक हातानं,

बिनबोभाट, बिनधास्त!

बसतात मांडीवर,

अलगत धपकन,

तुमच्या मांडीवर 

 बसावं तसे बसतात,

खुशीत निवांत....

निवांत मनसोक्त!


कारभारी त्रिभुवन,पालखेडकर,

मो.नं.7972856531

_____

संघर्षाच्या वाटेवर...


ही वाट नाही फुलांची, ही काट्यांची शाळा आहे,

माणुसकीच्या जखमांवरचा, हा मायेचा पाळा आहे.


जिथे माजला अंधार तिथे, प्रकाश व्हायचे स्वप्न उरी,

संघर्षाच्या वाटेवरची, ही जिद्दीची पाऊलधुळी.


शोषितांचे अश्रू पुसता, हाताला येते रक्त कधी,

अन्यायाचे डोंगर फोडता, व्हावे लागते सक्त कधी.


हक्क कुणाचे हिरावले, तर वादळ होऊन उठायचे,

भ्रष्ट नीती अन जुन्या रूढींचे, साखळदंड हे तोडायचे.


एकटा नाहीस तू या वाटेवर, संतांचा हा वारसा,

बाबा, गाडगे, फुलेंचा तो, क्रांतीचा हा आरसा.


पद, पैसा अन प्रतिष्ठेचा, मोह नसावा मनात कधी,

समाजाच्या कल्याणासाठी, जळावे लागते उन्हात मधी.


थकेल शरीर, झुंजेल मन, पण ध्येय ढळू देऊ नको,

माघार घेण्यापूर्वी तू, मागे वळून पाहू नको.


परिवर्तनाची पहाट येईल, श्रमाची हीच पुण्याई,

संघर्षाच्या या वाटेवर, क्रांतीचीच गाणी गाई.


कवी: गोपाळ धारपवार

नवीन पनवेल रायगड 

मो.9833967950

_______

* बाप दिव्यांची वात *


जसा दिपक जळतो 

तसे आयुष्य जळते

क्षण क्षण जळतांना 

बाप  मुलां  उजळते 


ऊन वारा वादळात 

घाम भाळी निथळते

वस्त्रा सच्छिद्र खिडकी 

सांग कोणास कळते!


अडी अडचण येता

दोन्ही हातास जोडते

मुला लेकरांच्यासाठी

काळा कातळ फोडते!


नाही अक्षर ओळख 

घोर अंधार चिरते 

मन उदास बेजार 

तरी कामात मरते!


असा अटल पहाड

सर्व घराचा आधार 

वासे फिरता घराचे

नेत्री आसवांची धार!


बाप कळलाच नाही 

उचलता खांद्यावर 

दिला निसर्गाने बापा

पुन्हा मरायचा  वर!


  *कृष्णा कुंभारे* 

वरुड, जि. अमरावती.

_____


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे....सौ. मनीषा विशाल सोन्नेकर

      मनुष्य हा देखील एक प्राणीच. मात्र, इतर प्राण्यांपेक्षा अतिशय हुशार व तर्कबुद्धी असलेला आणि चांगल्या विचारविनिमयाची कास धरणारा प्राणी. ...