बुधवार, २२ एप्रिल, २०२६

आंबेडकरी समुदायाचे वेगळेपण : विचार, क्रांती आणि आत्मसन्मान



आमचे परममित्र फारूख अहमद यांचा आज वाढदिवस आहे. फारूख भाईंबद्दल अनेकांनी लिहिले आहे; पण आज मला फारूख भाईंना मोठं करण्यात सिंहाचा वाटा असलेल्या समुदायाबद्दल बोलायचे आहे.

काही वर्षांपूर्वी समांतर सिनेमाबद्दल बोलताना अमोल पालेकर यांनी तत्कालीन परिस्थितीची जाणीव करून दिली होती. “वर्गसंघर्ष हा माझा संघर्ष आणि माझ्या लेखनाचा भाग आहे. इतरही अनेक गोष्टी आहेत, त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही,” असे मला वाटते.

सत्तर-ऐंशीच्या दशकाचे चित्र मला “सद्गती” या सिनेमात पाहायला मिळाले. त्या चित्रपटातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते काहीतरी राहून जाते आहे. 

समाजात काही लोक एकेरी गुलामगिरीच्या बेड्यांनी जखडलेले होते, तर काही दुहेरी गुलामगिरीच्या बेड्यांनी.

एकेरी गुलामगिरी कधी तुटली, पुन्हा आली; पण दुहेरी गुलामगिरी कायम टिकून राहिली. अस्पृश्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समुदायावर ही दुहेरी बेडी होती. ही बेडी तोडण्याचा प्रयत्न महात्मा फुले यांनी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ती बेडी पूर्णपणे तोडली आणि आंबेडकरी समुदायाला एक स्पष्ट संदेश दिला

“ही बेडी पुन्हा पायात घालू नका, स्वतंत्र जगा.”

हा सल्ला अनुयायांनी ऐकला, आचरणात आणला म्हणून मला या समुदायाचा हेवा वाटतो.

आम्ही तथाकथित लोक हे लिहिताना संकोच करतो; पण आचार्य कुरुंदकर यांनी या समुदायाचे मोठेपण स्पष्टपणे अधोरेखित केले आहे. सत्तर-ऐंशीच्या दशकात त्यांनी केलेली भाकिते आज खरी ठरताना दिसतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांचे वेगळेपण आणि मोठेपण सांगताना मला कोणताही संकोच वाटत नाही.

पुरोगामी म्हणवणाऱ्या लोकांचे दोन गट दिसतात

एक समतावादी आणि दुसरा समन्वयवादी.

समन्वयवादी हे परंपरावादी असतात. ते जुने, कालबाह्य आणि शोषणवादी विचार पूर्णपणे सोडत नाहीत; पण सुधारणा मात्र हवी असे त्यांना वाटते. या समन्वयवादी गटात अनेक सुधारक येतात. आचार्य कुरुंदकर यांनी लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे यांची उदाहरणे देत यावर सविस्तर भाष्य केले आहे.



मात्र समतावादी विचारधारेचा विचार केला, तर पहिले नाव महात्मा फुले यांचे घ्यावे लागेल, दुसरे महत्त्वाचे नाव शाहू महाराजांचे आणि तिसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे. ही यादी मोठी आहे, पण या तिघांचे योगदान क्रांतिकारी आहे.

या देशात क्रांती आणि प्रतिक्रांतीची दोन हजार वर्षांची परंपरा आहे. प्रतिक्रांतीसाठी केवळ एका घटकाला जबाबदार धरणे हे अर्धसत्य आहे. मी फक्त ब्राह्मण समाजाला जबाबदार मानत नाही; तर समाजातील मानसिकतेलाही तितकाच जबाबदार मानतो.

जे स्वतःहून गुलामगिरी स्वीकारतात, ते शोषणाला संधी देतात. इतिहासात शोषण करणारा जितका जबाबदार आहे, तितकाच शोषण सहन करणारा देखील जबाबदार ठरतो.

गुलामगिरीच्या बेड्या तोडण्यासाठी अनेकांनी संघर्ष केला; पण एक मर्यादेनंतर त्यांच्या विचारांना बाजूला ठेवून व्यक्तीची पूजा केली गेली. आणि मग पुन्हा स्वतःच्या हाताने गुलामगिरी स्वीकारली गेली. व्यक्तिपूजेच्या या प्रवृत्तीमुळे शोषण कायम राहिले. हे चक्र हजारो वर्षे चालू राहिले.

पण आंबेडकरी समुदायाचे वेगळेपण येथे ठळकपणे दिसते.

(येथे “आंबेडकरी समुदाय” हा शब्द जातीपुरता मर्यादित नसून, आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या सर्वांसाठी वापरला आहे.)

या समुदायाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना सोडले नाही आणि पुन्हा प्रतिक्रांतीचा बळी ठरला नाही. त्यांनी परिवर्तनवादी चळवळीच्या माध्यमातून क्रांतीचा मार्ग स्वीकारला. अनेक चळवळींची उदाहरणे देता येतील.

तथाकथित आंबेडकरी लोक पद, प्रतिष्ठा किंवा पैशासाठी विचारांशी तडजोड करत नाहीत. आंबेडकरी असल्यामुळे कुणालाही आंधळेपणाने पाठिंबा दिला जात नाही. उलट, विचारांपासून विचलित झालेल्यांवर कठोर टीका केली जाते.

आंबेडकरी समुदायासाठी बुद्धिप्रामाण्यवाद आणि विचार हेच प्रमाण आहेत हे त्यांचे खरे वेगळेपण आहे.

मी स्वतः कोणाचाही द्वेष करत नाही. माझ्या मित्रपरिवारात अनेक ब्राह्मण मित्र आहेत; पण ते यासाठी नाहीत की मी कोणत्या उच्च कुळात जन्मलो. ते सर्व विवेकी, विचारशील आणि परिवर्तनवादी आहेत म्हणून ते माझे मित्र आहेत.

त्याचप्रमाणे आंबेडकरी समुदायातील लोकांचा विवेकवाद मला प्रभावित करतो. गुलाम म्हणून जगणे त्यांना मान्य नाही हे त्यांच्या चळवळीचे फलित आहे.

जर मला धर्म निवडण्याचे स्वातंत्र्य असते, तर मी निःसंकोचपणे “इस्लाम” निवडला असता. इस्लामसोबत गरीबी आणि इतर धर्मांसोबत श्रीमंती असा पर्याय दिला तरी मी इस्लामच निवडला असता.

आणि जर मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळात अस्पृश्य समाजात जन्मलो असतो, तर १९५६ साली मी नक्कीच बौद्ध धम्म स्वीकारला असता. कारण त्या काळातील परिस्थितीत आत्मसन्मानाने जगण्यासाठी तोच योग्य मार्ग होता.

धर्मांतर ही सोपी गोष्ट नाही; पण लाखो लोकांनी विवेकाने निर्णय घेतला आणि बौद्ध धम्म स्वीकारला. हे त्यांच्या विचारशक्तीचे आणि धैर्याचे लक्षण आहे.

आंबेडकरांनी दिलेला नवबौद्ध धम्म हा परंपरागत रूढींना छेद देणारा, स्वाभिमान देणारा आणि समतेवर आधारित होता. या नव्या मार्गात लोकांना आश्रय मिळाला आणि त्यांचे जीवन बदलले.

मला या नवबौद्धांचा हेवा वाटतो कारण त्यांनी विवेकाने नेता निवडला आणि त्याच्या विचारांना स्वीकारले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वात मोठे बलस्थान म्हणजे त्यांची निर्णयक्षमता. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची ताकद त्यांच्यात होती. त्यांच्या या गुणाचा प्रभाव त्यांच्या अनुयायांमध्येही दिसतो ही अत्यंत समाधानाची बाब आहे.

आंबेडकरी समुदायाने सिद्ध करून दाखवले आहे की तो क्रांतीवादी आहे आणि प्रतिक्रांती येथे शक्य नाही. स्वातंत्र्यानंतर पंचाहत्तर वर्षे झाली, तरी हा विश्वास टिकून आहे.

या समुदायात दोष नाहीत असे नाही; अशिक्षित आणि अविवेकी लोकही आढळतात. पण इतर समाजांच्या तुलनेत पाहिले, तर त्यांच्या वैचारिक प्रगतीची पातळी लक्षणीय आहे.

या प्रगतीमागे शिक्षणाचा मोठा वाटा आहे.

“शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला संदेश केवळ घोषवाक्य राहिला नाही, तर तो जीवनमंत्र ठरला.

शिक्षणामुळे आत्मभान आले, बौद्धिक चळवळी उभ्या राहिल्या, आणि समाजाने स्वतःचा विकास घडवून आणला.

नवमतवादाचा स्वीकार आणि परंपरागत रूढींचा त्याग यामुळे या समुदायाने स्वतःला नव्याने घडवले. वैचारिक मंथनामुळेच विकास शक्य झाला.

क्रांतीसाठी केवळ भावनाच नव्हे, तर विचारांचीही आवश्यकता असते आंबेडकरी चळवळीने हे सिद्ध केले.

आंबेडकरी समुदाय खूप प्रगत झाला आहे, असे मी म्हणत नाही; पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या आधारावर त्यांनी जी प्रगती केली, ती नक्कीच अनुकरणीय आहे.

सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हा समुदाय पुन्हा प्रतिक्रांतीचा बळी ठरला नाही.

या समुदायाने फारूख अहमद यांना प्रेम दिले. गेली वीस वर्षे फारूख भाई शोषितांच्या हक्कांसाठी लढत आहेत.

त्यांच्या कार्यामागे आंबेडकरी विचारांची प्रेरणा आहे आणि म्हणूनच त्यांचे कार्य केवळ वैयक्तिक नसून, एका मोठ्या वैचारिक क्रांतीचा भाग आहे.

मुस्लिम बांधवांसाठी:-

मौलाना आझादांसारख्या नेत्यांपासून सुरू झालेला मुस्लिम समाजाचा समृद्ध राजकीय आणि शैक्षणिक वारसा आज कमकुवत झाल्याचे दिसते. अनेक मोठी पदे मिळूनही आज समाज मुख्य प्रवाहापासून काहीसा दूर आणि मागासलेला आहे. विशेषतः प्रभावी, विचारनिष्ठ नेतृत्वाची कमतरता प्रकर्षाने जाणवते.

अशा कठीण आणि ध्रुवीकरणाच्या काळात फारूख अहमद यांसारखे नेतृत्व आशेचा किरण ठरते. कायद्याची सखोल जाण, प्रभावी वकृत्व, आणि मुद्देसूद मांडणी यासोबतच ते वंचित, शोषित घटकांच्या प्रश्नांवर सातत्याने लढा देत आहेत. भडकाऊ भाषणांऐवजी त्यांनी विचार, आंदोलन आणि समाजसेवा यांचा मार्ग स्वीकारला आहे, ही त्यांची मोठी जमेची बाजू आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी स्वतःचा वेळ, पैसा आणि ऊर्जा समाजासाठी खर्च केली. शिक्षण, रोजगार, गरीब-गरजूंना मदत, अन्यायाविरुद्ध आवाज अशा अनेक पातळ्यांवर ते काम करत आहेत. तरीही समाजाकडून त्यांना अपेक्षित पाठबळ मिळत नाही, ही दुर्दैवी बाब आहे.

आज परिस्थिती अशी आहे की, समाजाने भावनिक किंवा धर्मांध राजकारणापेक्षा विचार करणाऱ्या, नैतिक मूल्यांवर उभ्या असलेल्या नेतृत्वाला साथ देणे गरजेचे आहे.

कारण खरा बदल घडवायचा असेल, तर अशा प्रामाणिक आणि समाजाभिमुख नेतृत्वाची संख्या वाढली पाहिजे म्हणजेच अनेक फारूख अहमद निर्माण झाले पाहिजेत.


लेखक:- नजीर शेख 

 नांदेड.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे....सौ. मनीषा विशाल सोन्नेकर

      मनुष्य हा देखील एक प्राणीच. मात्र, इतर प्राण्यांपेक्षा अतिशय हुशार व तर्कबुद्धी असलेला आणि चांगल्या विचारविनिमयाची कास धरणारा प्राणी. ...