*जांदुई जंगल : (बाल कादंबरी)*
*लेखक : समाधान शिकेतोड*
*प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे.*
*पृष्ठे : 134*
*किंमत : 180 रुपये*
*समीक्षक : संजय ऐलवाड*
-----------------
*अद्भूत रसाचा उत्कठांवर्धक प्रवास : जादुई जंगल*
प्राण्यांविषयी जाणून घेण्याची उत्सुक्ता कायम मुलांमध्ये असते. त्यातल्या त्यात प्राणी बोलणारे असतील, तर मजाच मजा. कारण बोलणार्या प्राण्यांच्या कथेत मुलांना रस असतो. त्यामुळे मनोरंजन करणार्या काल्पनिक गोष्टीत मुले रममाण होतात. कल्पनेसह मोलाचा सामाजिक संदेश देणारी समाधान शिकेतोड यांची ‘जादुई जंगल’ ही बाल कादंबरी अद्भूत रसाचा उत्कठांवर्धक प्रवास आहे. त्यामुळे ही बाल कादंबरी मुलांच्या भावनांना स्पर्श करून मनात घर करणारी आहे.
या बाल कादंबरीची सुरूवातच प्रसन्न अशा अथाग जंगलात होते. अर्थातच हे जंगल जादुई आहे. त्यामुळे या जंगलातील प्रत्येक प्राण्यांकडे कोणत्या ना कोणत्या प्रकारचा कला आहे, जादु आहे. त्यामुळे कादंबरीच्या पहिल्या पानासापूसन सुरू झालेला मनोरंजनात्मक प्रवास शेवटच्या पानापर्यंत वाचकांना खिळवून ठेवतो. प्राण्यांना प्राप्त झालेली जादूई शक्ती, त्याचा वेळोवेळी होणारा वापर, आणि जादुच्या माध्यमातून जंगलात होणारे सकारात्मक बदल त्यामुळे वाचकही कळत न कळतपणे जंगलाचाच एक भाग होऊन जातात. कादंबरीतल्या प्रत्येक पानावरचा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. वाचकांनाही जंगलात वावरत असल्याची अनुभूती येते.
समाज असो की जंगल, या दोन्ही ठिकाणी सकारात्मक आणि नकारात्मक विचार करणारे दोन गट आहेत. मात्र जादुई जंगलात नकारात्मक विचार करणार्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. तर सकारात्मक विचार करणार्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे जंगलावर किंवा प्राण्यांवर संकट आले की, ते सकारात्मक जादूने दूरही होते. त्यामुळे प्रत्येक घटनेतून मुलांवर सकारात्मक संस्कार होतात. एकीकडे हे संस्कार सकारात्मक आहेत, तर दुसरीकडे ते जादुई आहेत. त्यामुळे या कादंबरीतील प्रत्येक घटना मुलांच्या मनावर परिणाम करते. किंबहुना ती मुलांच्या मनात घर करून मुलांना सकारात्मक विचार करण्यास भाग पाडते. हे लेखक समाधान शिकेतोड यांच्या लेखनीचे यश आहे.
या बाल कादंबरीत ससा, लांडगा, वाघ, रानमांजर, मोर, अजगर, माकडं, हत्ती, बंगळा, पोपट, हरिण आदी प्राणी, पक्ष्यांचा समावेश आहे. यातील प्रत्येक प्राणी, पक्षी सामाजिक संदेशाशी जोडला गेला आहे. बाल कादंबरीतील जंगल, त्याची रचना, त्यातील झाडे, परिसराच्या अचुक वर्णनाने वाचक या कादंबरीशी एकरूप होतो. साधी सोपी भाषा, छोटी छोटी व प्रभावी वाक्ये, प्राणी, पक्ष्यांतील बारकावे, उत्कठांवर्धक प्रसंग आदीमुळे ही बाल कादंबरी अधिक प्रभावी झाली आहे. उत्तम निर्मिती, बोलके मुखपृष्ठ, आशयघन रेखाटने ही या बाल कादंबरीचे वैशिष्ट्ये आहे. या बाल कादंबरीच्या माध्यमातून समाधान शिकेतोड हे मुलांना अद्भूत रसाची भन्नाट जादूई सफर घडवून आणण्यात यशस्वी झाले आहेत. त्यामुळे समाधान शिकेतोड यांचे मन:पूर्वक अभिनंदन. पुढील लेखनास खुप शुभेच्छा.
- समीक्षक : संजय ऐलवाड
पुणे


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा