*मोहरली आमराई*
शिशिरात पानगळ
करपली जाई जुई
ऋतू वसंत रानात
मोहरली आमराई!
नवी पालवी फांदीत
कंठ कोकीळेस फुटे
नवी नवेली ती नार
वाण संक्रातीचं लुटे!
स्वर पंचम कानात
उष्ण वाहतील झळा
रक्तवर्णी पळसांची
किती सुंदर ती कळा!
तीळ तीळ ते जाळते
काळ्या ढेकलात ऊनं
फांदीवर नांदलेली
लोळे मातीतून पानं!
तेजाळल्या उन्हातळी
वारा घेईल गिरकी
उंच आकाशात धूळ
पळे थोडीशी तिरकी
ओठ चोखतील उद्या
पाडा आली गोड कोय
सांजवाती निलनभी
उडे बगळ्यांची ओळ!
जर्द पिवळ्या फुलांचा
शोभे खुलून गजरा
आंबा मोहरून येता
रोखे तारुण्य नजरा!
कवी- कृष्णा कुंभारे
वरुड ,जि .अमरावती.
____________
*वाण संक्रांतीचे*
सौभाग्याचं वाण
संक्रांतीच्या दारी
नेसे अंगी शालू
सुवासिनी भारी!
सौभाग्याचं नाव
घेता खूप लाजे
श्रीश्री झाले माझ्या
हृदयाचे राजे!
तोडूनिया बंध
गाठले सासर
वाण पदराला
माहेराची सर!
गुलाबी गालात
चांदण्यांची छबी
लक्ष्मी उंबऱ्यात
आनंदात उभी!
नको वाळवंट
सासरच्या दारी
मोगऱ्याच्या गंध
गजरा सवारी!
तिळ तिळ चढे
सूर्य नारायण
सुख सोहळ्यात
घडो पारायण!
भाळावरी सदा
राहो शुभ टिळा
मंगल सुत्रात
शोभिवंत गळा!
आनंदात यावा
संक्रांतीचा सणं
मैत्रिणींना मिळो
पदरात वाणं!
कवी- कृष्णा कुंभारे
वरुड, जि .अमरावती.
_______
*आठवणी पाऊस*
जरी अधीर अधर
प्रिये नजर बोलली
क्षण एक कटाक्षात
दर्दी हृदये सोलली!
तुझी श्रीमंत जवानी
हृदयांचं करे पाणी
तुझा पैंजणी निनाद
देतो मज आठवणी!
बट कुरळ्या केसांची
गाली झुलती नागिण
तुझा हसरा चेहरा
भासे शरद चांदणं!
रुंजी घालती भ्रमर
अंगी तारुण्य संभार
क्षण परागी सेवाया
भृंगे होतात सवार!
मार्गी मयुरी चालता
किती पडले मोहात
कोणी खुडले सुमन
केला स्वप्नांचा घात !
जणू स्वर्गाची अप्सरा
आली उतरुन खाली
रुप पाहता भाळून
वाट रोखतो मवाली!
नको उत्तान शृंगार
थोडी मर्यादा असावी
साडी चोळी पदरात
नारी सोज्वळ दिसावी!
*कृष्णा कुंभारे*
वरुड, जि. अमरावती*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा